Team WebNewsWala
Other शहर शिक्षण समाजकारण

MumUni School of Thoughts च्या माध्यमातुन शिक्षणव्यवस्थेवर अभ्यासपूर्ण संयमी चर्चा

Mumuni School of Thoughts अकादमीच्या वतीने सुरु असलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत रविवार दि.१३ सप्टेंबर, २०२० रोजी, झूम अ‍ॅपवर संध्याकाळी ५:०० वाजता प्रा. प्रतिभा कांबळे यांचे 'टाळेबंदी नंतरची अर्थव्यवस्था: स्वरूप आव्हाने व क्षमता' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

MumUni School of Thoughts या अकादमीच्या वतीने ऑगस्ट महिन्यापासून ऑनलाइन परिसंवाद सुरू करण्यात आला आहे. दर रविवारी होणाऱ्या नवनव्या व समकालीन विषयांवरील व्याख्यानाबरोबरच श्रोत्यांना आता तज्ज्ञांच्या चर्चा व निष्कर्ष जाणून घेता येणार आहेत.

मुद्दा तुमचा आमचा सर्वांचा’ ह्या शीर्षकांतर्गत परिसंवाद 

दर महिन्याच्या एका रविवारी ‘मुद्दा तुमचा आमचा सर्वांचा’ ह्या शीर्षकांतर्गत परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत .याची सुरुवात रविवार दि.९ ऑगस्ट रोजी ‘शिक्षण व्यवस्थाः लाॅक अनलाॅक’ या विषयावर आयोजित परिसंवादाने झाली.

covid-19 ने निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीमुळे सर्व व्यवस्थांमध्ये अंतर्बाह्य व वेगवान बदल झाले.शिक्षण व्यवस्थाही याला अपवाद नाही.यातच देशात नवे शैक्षणिक धोरण जाहिर झाले.ह्या दोहोंच्या पार्श्वभूमीवर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

नक्की वाचा >> MumUni School of Thoughts – समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न
शिक्षण व्यवस्था : लॉक अनलॉक

परिसंवादाच्या ‘शिक्षण व्यवस्थाःलॉक अनलॉक’ या शीर्षकांतर्गत १.ऑनलाइन शिक्षणनवेपण व मर्यादा, २.विद्यार्थी शिक्षक संबंध व शिक्षण प्रक्रिया ,३.शिक्षणाचे भाषा माध्यम, ४.उपाय प्रयोग नवता गुंतवणूक व लोकसहभाग आणि ५.नवे शैक्षणिक धोरण ह्या मुद्द्यांआधारे चर्चा करण्यात आली.

MumUni School of Thoughts च्या ह्या परिसंवादांमध्ये मा. प्रशांत तायडे प्रा.प्रज्ञाकिरण वाघमारे प्रा.संदीप कदम प्रा.राहुल कोसंबी सहभागी झाले होते. प्रा.डॉ.विद्यानंद खंडागळे हे या परिसंवादाचे सर परीक्षक होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. संदीप भांगरे यांनी केले.श्री. प्रशांत भालेराव यांनी तंत्रज्ञानाची जबाबदारी सांभाळली.

नक्की वाचा >> कोविड 19 सामाजिक जन जागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन

ऑनलाइन शिक्षण यातील नवेपण हीच मोठी मर्यादा

शानू पटेल हायस्कूल वारजे पुणे येथील इंग्रजीचे शिक्षक श्री. प्रशांत तायडे यांनी विद्यार्थीकेंद्री भूमिकेमधून मांडणी केली. ऑनलाइन शिक्षण यातील नवेपण हीच मोठी मर्यादा ठरते. विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होते आहे .आंतरजाल व इलेक्ट्रॉनिक उपकरणे यावर ऑनलाइन शिक्षण अवलंबून आहे.नेमकी त्याचाच अभाव विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित कारणीभूत ठरतो.

थेट व ध्वनिचित्रमुद्रण अशा दोन प्रकारात सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.यामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील थेट व प्रत्यक्ष संवादाला मर्यादा येते.शिक्षण प्रक्रियेतील मुलांवरील परीक्षांचे ओझे कमी करण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्यांची वजाबाकी- बेरीज होताना दिसते. अशा परिस्थितीत मुलांची क्षमता व त्यांच्या पालकांकडून असलेली अपेक्षा व त्यांची स्वप्ने हे शिक्षकां समोरील आव्हान आहे. शिक्षणाचे भाषा माध्यम निवडताना मातृभाषा व इंग्रजी यामधील दोन द्वंद्वात पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे झुकलेला आहे.

मातृभाषेची पुनर्व्याख्या करण्याची गरज

ह्याच आधारावर मातृभाषेची पुनर्व्याख्या करण्याची गरज निर्माण झाली आहे.मराठी माध्यमात शिक्षण घेताना मराठीच्या विविध बोलीभाषांना ज्ञान प्रसाराची भाषा करणे आवश्यक आहे. ज्ञानभाषा व विद्यार्थ्यांची बोलीभाषा यामध्ये शिक्षकाने पूल निर्माण करण्याची गरज आहे. अध्ययन प्रक्रियेमधील आकलन, विचार , विश्लेषण व ज्ञाननिर्मिती अशा तिन पातळीवर बोलीभाषा व ज्ञानभाषा एकत्रपणे कार्यान्वित करणे आवश्यक आहे.

शिक्षणातील गुंतवणूक व लोकसहभाग हा नफेखोरीला चालना देतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्याचे पूर्व शिक्षण देणाऱ्या संस्था. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या धोरणाद्वारे जवळपास 70 टक्के इंग्रजी शाळा खाजगी संस्थांद्वारे चालवल्या जात आहेत.खरेतर शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारायला हवी. नवे शैक्षणिक धोरण हे वरकरणी चांगले दिसत असले तरी त्याची गुणवत्ता ही त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे.मात्र शिक्षणाचे केंद्रीकरण ही त्याची मर्यादा आहे.

नक्की वाचा >> MumUni School Of Thoughts च्यावतीने अण्णा भाऊ साठे यांना मानवंदना

Uni School of Thoughts च्या प्रा.प्रज्ञाकिरण वाघमारे यांनी या विषयावर अधिक नैतिकतावादी भूमिकेमधून आपले विचार मांडले.शिक्षणसंस्था शिक्षक व विद्यार्थी यांच्या परस्पर संबंधातील गुणोत्तरावर त्यांनी मांडणी केली. ऑनलाईन शिक्षण हा परिस्थितीजन्य पर्याय आहे व हेच आव्हान आहे कारण याद्वारे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत परस्परसंबंध ते आभासी असा मोठा बदल झाला आहे.

यामध्ये पालकांवरील आर्थिक बोजा वाढला असून विद्यार्थी ग्राहक झाला आहे शासनाने विद्यार्थ्यांसाठी पीडीएफ स्वरूपातील मोफत पाठ्यपुस्तके व दिशा ॲप सारखे माध्यम उपलब्ध करून दिले असले तरी ते प्रयत्न तोकडे आहेत. त्यात समाजातील तंत्रज्ञान निरक्षरता,मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम व शालाबाह्य मुलांचे शिक्षणबाह्य होणे हि आव्हाने अधिकच तीव्र होत आहेत.

विद्यार्थी-शिक्षक संबंध व शिक्षण प्रक्रिया शिक्षणाची उद्दिष्टे व साधने यावर अवलंबून असतात. तंत्रज्ञानामुळे ज्ञानस्त्रोत जरी वाढले असले तरी विद्यार्थ्यांचा वैश्विक संपर्क हा शिक्षकाच्या संपर्कात घडत असतो. विद्यार्थ्याचे घडणे हे शिक्षकाचे चारित्र्य व कृती यावर अवलंबून असते. शिक्षकामधील तर्कसंगतीचा अभाव विद्यार्थ्यांमध्ये विसंगती निर्माण करतो.

त्यासाठी चांगल्या व गुणवंत शिक्षकांची आवश्यकता आहे.परंतु युनेस्कोच्या अहवालानुसार गुणवंत शिक्षकांच्या तुटवड्यामध्ये आपल्या देशाचा क्रमांक दुसरा आहे.त्यातच न परवडणाऱ्या खाजगी शिक्षण व्यवस्थेने 160 कोटी डॉलरचा केलेला धंदा व ह्या काळात झालेली 35 टक्क्यांची वाढ शिक्षण व्यवस्थेच्या अवनतीला जन्म देत आहे.

शिक्षणाचे भाषा माध्यम निवडताना पालकांमध्ये तर्कसुसंगतीचा अभाव आढळतो.प्रतिष्ठित तेच अधिक गुणवंत ह्या आभासामुळे गुणवत्तेच्या विचाराला बगल दिली जाते.आपल्या देशात बोलीभाषांचा मोठा वारसा आहे.मायबोली मूल्य ,श्रद्धा व बांधिलकीची निर्मिती व प्रसारण करते. त्यासाठी मायबोलीला सक्षम करणे आवश्यक आहे.स्थलांतर, तंत्रज्ञानाचा महास्फोट, मातृभाषेविषयी शासनाचे अकार्यक्षमता धोरण,लोकांमधील मातृभाषेविषयी आपुलकीचा व स्वाभिमानाचा अभाव ह्या कारणांमुळे आज सुमारे तेराशे मराठी शाळा बंद होण्याच्या अवस्थेत आहेत.

शिक्षणातील प्रयोग व नवता हे शैक्षणिक धोरणाच्या प्रगतिशीलतेवर अवलंबून असतात. त्यासाठी शैक्षणिक धोरणाने शिक्षणाची सुलभता, रास्तता, उत्तरदायित्व व गुणात्मकता यावर ध्यान देणे आवश्यक आहे. सध्याची शिक्षण व्यवस्था धनवंत तोच गुणवंत अशा विचित्र अवस्थेत सापडली आहे. खरेतर लोकसहभागामुळे शिक्षण व्यवस्था अधिक गतिशील व सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते परंतु चित्र काहीसे उलटे दिसते आहे.

लोकसहभाग व गुंतवणुकीमुळे शिक्षण ही क्रयवस्तू बनली आहे. त्यातील नफेखोरी शिक्षणसंस्थेच्या स्वायत्ततेवर आक्रमण करीत आहे.येथे आपल्याला रविंद्रनाथ टागोर, म. गांधी, जाॅन ड्युई यांच्या शैक्षणिक प्रारूपांची उपयुक्तता समजून घेणे आवश्यक आहे. नवे शैक्षणिक धोरण हे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेचा आराखडा बदलणारे आहे.खरेतर शैक्षणिक धोरणांमधील विचारधारा कोणाची व कोणासाठी ह्याचा विचार आवश्यक ठरतो. शिक्षण धोरण निर्मितीमधील राजकीय घुसखोरी चिंता वाढवणारी असते व त्यामुळे ते आशावादी होऊ शकत नाही.

नक्की वाचा >> कोविड 19 सामाजिक जन जागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन

प्रा. संदीप कदम यांनी व्यवहारवादी विश्लेषणातून मांडणी केली. ऑनलाईन शिक्षण हा स्थित्यंतराचा टप्पा आहे.ती एक संमिश्र शिक्षणपद्धती असून स्वयम् शिक्षणावर भर देणारी व पाठ्यपुस्तकेतर शिक्षणव्यवस्था आहे.या व्यवस्थेने सर्वात मोठे आव्हान पालकांसमोर उभे केले आहे.

शहरातील पालक आपल्या पाल्यासाठी शिक्षणात गुंतवणूक करतात ती त्यांच्या ध्येय निश्चितीवर अवलंबून असते. परंतु कोविडच्या काळात नोकरी गमावण्याची धास्ती असल्याने वा गमावल्यामुळे त्यांच्यात बेचैनी निर्माण झालेय. तर ग्रामीण भागातील पालकांना ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी साधने परवडणारी नाहीत. ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.

यात आयटी कंपन्यांची मक्तेदारी वाढली. या दरम्यान झालेली अभ्यासक्रमाची मोडतोड निराश करणारी आहे. अभ्यासक्रमातील महत्वाचे,संस्कारशील, अधिक उपयुक्ततावादी पाठ वगळण्यात आले.पदवी पातळीवरील शिक्षणात बरेच अडथळे निर्माण झाले आहेत. ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेमुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील संबंधात कृत्रिमता निर्माण झाली आहे.

दोघांनाही अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळतो का हा मोठाच प्रश्न आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण हे वर्गातील अध्यापनापुरते मर्यादित आहे.याआधी वाचन हीच अध्यापनाची तयारी होती. ऑनलाईनमुळे शिक्षकाला विषयाचे वाचन व सादरीकरण करण्यावर अधिक वेळ खर्च करावा लागतो. येथे शिक्षक सहाय्यक झाला आहे. मुलांचा सामाजिक वर्तन व्यवहार शाळा-महाविद्यालयात घडतो.

मात्र आता घर व शाळा यात फरक उरलेला नाही.शिक्षकांवरील संस्थाचालकांचा दबाव विद्यार्थ्यांवरील पालकांचा ‘वॉच’ हे दोघांच्याही एकाग्रतेमधील अडथळे आहेत. येथे दोन्ही बाजूंकडून समंजस वृत्तीची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत शिक्षणाचे माध्यम तंत्रज्ञान आहे व त्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे. डिजिटलाईज शिक्षण प्रणालीमध्ये मातृभाषेतून शिक्षण घेणारे ग्रामीण भागातील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी स्पर्धेत मागे पडण्याची भीती नाकारता येत नाही. शिक्षणातील नव्या प्रयोगासाठी विकसित समाज मनाची गरज असते.

शिक्षण व्यवस्थेतील लोकसहभाग उत्पन्न स्त्रोतांवर अवलंबून आहे.त्यामध्ये एकात्मता येणे आवश्यक आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात खाजगी गुंतवणूकी बरोबरच वेळेची गुंतवणूक मोलाची ठरणार आहे.नव्या शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणावरील सहा टक्‍क्‍यापर्यंत खर्च करण्याचा निर्णय, बाल शिक्षण व मातृभाषेतील शिक्षण, संशोधन याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे त्यामुळे ते आशावादी दिसते आहे.परंतु पालक व समाज यांच्या सहभागाचा उल्लेख, खाजगीकरण,समूह पद्धती,व्यवसाय शिक्षणामुळे उच्चशिक्षणाला येणाऱ्या मर्यादा हा चिंतेचा विषय आहे.

MumUni School of Thoughts च्या या परिसंवादामध्ये प्रा. राहुल कोसंबी यांच्या समाजशास्त्रीय विश्लेषणाने चर्चेला वेगळा दृष्टिकोन मिळाला. ऑनलाईन शिक्षण हा समाजातील अदृष्य शैक्षणिक बदल आहे.ते भांडवलशाहीचे उत्पादन आहे.औद्योगिक क्रांतीने शाळा व शिक्षण यांचे अधिकृतीकरण केले.ऑनलाइन शिक्षणाने मात्र शाळा व शिक्षण यांच्यात फारकत केली.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीने प्रोग्रामिंग लैंग्वेज,अवजड उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या साधनांना नियंत्रित करणारी भाषा अशी साैम्य उत्पादने निर्माण करून ज्ञानक्षेत्राचे भांडवलीकरण केले. ऑनलाइन शिक्षण हे अपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील तोकडी शस्त्रक्रिया आहे. त्यामध्ये 80 टक्के समाज परिघावरच राहणार आहे.

देशात एक लाख दहा हजार शाळा एक शिक्षकी आहेत.अनेक शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे.दिवसाच्या सरासरी 20 रुपये उत्पन्नावर जगणार्‍या समाजाला ऑनलाइन शिक्षण परवडणारे नाही. डिजिटलायझेशनमुळे एकलकोंडेपणा वाढला आहे.त्यामुळे विद्यार्थी शिक्षक व पालक यातील संबंध ढासळला आहे.एकूण राष्ट्रीय उत्पन्न व शिक्षणावरील एकूण खर्च यांच्या व्यस्त प्रमाणामुळे दर्जात्मक व गुणात्मक शैक्षणिक संसाधने पुरवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे की काय आजच्या शाळांची गुणात्मक स्थिती ही 1983 च्या शाळांपेक्षा कमी आहे. शिक्षण माणूस या जैव प्राण्याचे रूपांतर सामाजिक प्राण्यात करते.

शिक्षणामुळे मानवी मूल्य व भावना अधिक नैतिक होतात. प्राथमिक संचित घेऊन शिक्षणव्यवस्थेत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीमध्ये शिक्षण प्रगल्भ नागरिकत्व निर्माण करते.परंतु सांप्रत माध्यमे व समाजमाध्यमे ज्ञानस्त्रोत बनली आहेत. त्यांचा ज्ञानक्षेत्रातील भांडवलवादी हस्तक्षेप ज्ञानरचना विस्कळीत करणारा आहे.कुटुंबसंस्था व समाज संस्था यांची मर्यादा शिक्षणाला मर्यादित करीत आहे.येथे सर्वोत्कृष्ट शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या नॉर्वे या देशाचा आदर्श घ्यायला हवा. विद्यार्थ्यांच्या वर्तन घडणीत शाळेबरोबरच समाजसंस्थांची जबाबदारी अधिक आहे.

शिक्षणाचे भाषा माध्यम समजून घेताना आपण भाषा हेच माध्यम अशी गल्लत करतो. खरेतर भाषा व माध्यम हे दोन्ही निराळे घटक आहेत. भाषा ही तिच्या अध्ययन व अध्यापनात स्वयंस्फूर्तीने टिकून असते.परंतु विज्ञान व सामाजिक शास्त्रांच्या अध्ययन -अध्यापनामध्ये भाषेचा प्रश्न निर्माण होतो.त्यामध्ये पुन्हा माध्यमभाषा,साहित्य भाषा व मातृभाषा यातील भेद अडचणी निर्माण करतात.अशाने केवळ श्रेणीबद्धता वाढते.हे चांगले लक्षण नव्हे.

सद्यस्थितीत तंत्रज्ञानातील ज्ञान निर्मिती करणारी इंग्रजी भाषा शिकणे अनिवार्य आहे. त्यासाठी फ्री इंग्रजीची आवश्यकता आहे. शिक्षण व्यवस्थेतील गुंतवणूक व लोकसहभाग नव्या उत्पादन प्रक्रियेने प्रभावित झाला आहे. नवउदारमतवादाच्या काळात विद्यार्थी हा ग्राहक,शिक्षक हा कामगार व शिक्षण संस्था कारखाने झाले आहेत. शिक्षणाचे व्यापारीकरण रोखायचे असेल तर शाळांमध्ये शिक्षण सक्तीचे व मोफत करणे, शिक्षणसंस्थांमध्ये अत्याधुनिक संसाधनांची निर्मिती व उपलब्धता करणे आवश्यक आहे.

नवे शैक्षणिक धोरण अांतरराष्ट्रीय शिक्षणाचा बागुलबुवा निर्माण करणारे एक गोंडस रूप आहे. यामध्ये संसाधने व बहुजन यांचा सहभाग किती व कसा असेल याची चर्चा नाही. आंतरशाखीय संबंध व व्यवसाय शिक्षण ह्या जरी जमेच्या बाजू असल्या तरी शिक्षण व नोकरी यांच्या व्यस्त प्रमाणात ते उपयुक्त ठरेल का हा प्रश्न चिंता वाढवणारा आहे.

या परिसंवादाचे सरपरीक्षक प्रा. डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी परिसंवादाच्या अखेरीस व्यवच्छेदक उपयुक्ततावादी मांडणी केली.ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेमधील नियम व अटींमुळे आलेला बंदिस्तपणा, ढासळलेली नैतिकता व मूल्यव्यवस्था,अमुलाग्र बदललेले ज्ञानाचे स्वरूप अशा संभ्रमाच्या काळात नवनिर्मितीशील शिक्षकांची आवश्यकता नमुद केली.

शिक्षणाच्या भाषा माध्यमांमध्ये स्वयम् इंग्रजी सोबतच बहुभाषिकता विकसित होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण व दुर्बल समाज घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने स्वीकारणे आवश्यक आहे. शालेय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पातळीवरील आंतरराष्ट्रीय केंद्रीय व राज्य शिक्षण परीक्षा मंडळ यामध्ये भेद करून त्याची प्रतिष्ठा व कनिष्ठता वाढवणे रास्त होणार नाही.या अवस्थेमध्ये शिक्षकाची भूमिका दिग्दर्शक पटकथा लेखक व अभिनेता अशी असणार आहे. त्यामुळे शिक्षकाची उत्पादकता वाढवणे आवश्यक आहे.

नक्की वाचा >> MumUni School of Thoughts – समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न
MumUni School Of Thoughts च्यावतीने अण्णा भाऊ साठे यांना मानवंदना
कोविड 19 सामाजिक जन जागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

आता केवळ 100 रुपयांत घ्या नाटकाचा आनंद

Web News Wala

भारतीय स्मार्टफोन उत्पादक पुनरागमनाच्या तयारीत

Team webnewswala

म्हाडाच्या ७५०० घरांची लॉटरी; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

Web News Wala

1 comment

स्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन - Web News Wala August 20, 2020 at 4:48 pm

[…] MumUni School of Thoughts च्या माध्यमातुन शिक्षणव्यव… […]

Reply

Leave a Reply