Other शहर

पालघर-सफाळे पर्यायी रस्त्यांची दुरवस्था

माकुणसार येथील खाडीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम  सुरू आहे. त्याला पर्यायी मार्ग असलेल्या केळवे रोड-कपासे तसेच दांडा खटाळी-अंबोडे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

पालघर : माकुणसार येथील खाडीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम  सुरू आहे. त्याला पर्यायी मार्ग असलेल्या केळवे रोड-कपासे तसेच दांडा खटाळी-अंबोडे   या दोन्ही पर्यायी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पालघरहून सफाळे गाठणे हे त्रासदायक ठरत असून या मार्गावर अनेक अपघात देखील होत आहेत.   तर माकुणसार पुलाचे कामात निधीची उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्याने कामाची गती मंदावण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

माकुणसार खाडीवरील पूल धोकादायक झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या पुलावरील गर्डर नव्याने तयार करण्याचे काम मार्च महिन्यापासून सुरू केले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी केळवे रोड-कपासे तसेच दांडा खटाळी-अंबोडे व मधुकरनगर या मार्गांचा पर्याय ठेवण्यात आला आहे.

सफाळे येथून पालघरकडे जाण्यासाठी असलेल्या कपासे-केळवे रोड मार्गावर मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांचे व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या मार्गावरील रस्त्याचा काही भाग अरुंद असल्याने अवजड वाहने समोरून आल्यानंतर या मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी होताना दिसते. त्याच पद्धतीने दांडा खटाळी-अंबोडे रस्त्याचीदेखील दुरवस्था झाल्याने पालघरहून सफाळे गाठणे कठीण झाले आहे.

निधीच्या अडचणीमुळे माकुणसार खाडीपुलाच्या कामाची गती मंदावणार ?

दांडा खटाळी-अंबोडे या रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी पन्नास लाख रुपये खर्च झाला होता. पहिल्याच वर्षी पावसाळ्यात रस्ता  याच भागात बऱ्याच ठिकाणी उखडून गेल्याने त्या ठिकाणी डांबरी मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र नंतर हा रस्ता पुन्हा मोठ्या प्रमाणात उखडला असून या मार्गावरून वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या सीमा रावते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता केळवे रोड-कपासे रस्त्यामधील खराब  रस्त्याच्या भागाचे दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच दांडा खटाळी-अंबोडे रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्यात येईल असे जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांकडून सांगण्यात आले. दांडा खटाळी नाका ते मधुकरनगर तसेच उसरणी गावातून मुख्य रस्त्यापर्यंतच्या मार्गाची दुरुस्ती पूरहानी शीर्षकांतर्गत प्रस्तावित असून त्याकरिता निधी मंजूर झाल्यास या कामांना प्रारंभ होईल, असेही सांगण्यात आले आहे.

जानेवारी अखेरपर्यंत पुलाचे काम

गेल्या सात महिन्यांपासून माकुणसार पुलाचे काम हाती घेण्यात आले असून सातपैकी चार स्पॅनवरील स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर पुलावरील पाचवा स्लॅब टाकण्याची तयारी पूर्ण झाली आहे. या मार्गावरून २६ जानेवारी किंवा जानेवारी अखेरपर्यंत वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जात असल्याचे अधिकारीवर्गाकडून सांगण्यात आले. हे काम पूर्ण करण्यामध्ये निधीच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे  या कामाची गती मंदावण्याची शक्यता वर्तविण्यात येते. दरम्यान, पुलाचे काम पूर्ण झाल्यास पालघर सफाळेदरम्यान वाहतूक करणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होईल, असे सांगितले जात आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Covid Center मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा गरबा Video Viral

Team webnewswala

True Caller ला टक्कर देणार गुगल आणले भन्नाट फीचर

Team webnewswala

१५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री

Team webnewswala

Leave a Reply