Team WebNewsWala
पर्यावरण शहर

सागरी किनारा मार्गासाठी प्रवाळ स्थानांतर काम सुरू

केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर सागरी किनारा मार्गामुळे बाधित होणाऱ्या प्रवाळ स्थानांतर प्रक्रियेस शुक्रवारी सुरुवात झाली.

मुंबई : केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर सागरी किनारा मार्गामुळे बाधित होणाऱ्या प्रवाळ वसाहतींच्या स्थानांतर प्रक्रियेस शुक्रवारी सुरुवात झाली. दिवसभरात वरळी येथील प्रवाळ स्थानांतर ८० टक्के  काम पूर्ण झाले असून हाजी अली येथील काम पुढील दोन दिवसांत होईल. मात्र या कामास पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम आहे.

सागरी किनारा मार्गाच्या टप्प्यात हाजी अली येथे ०.११ चौरस मीटर आणि वरळी येथे ०.२५ चौरस मीटर इतक्या आकारमानाच्या एकूण १८ प्रवाळ वसाहती आहेत. किनारा मार्गामुळे त्यांचे स्थानांतर करावे लागत आहे. स्थानांतराचे काम गोवा येथील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी-एनआयओ) यांच्या तज्ज्ञांमार्फत कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत शुक्रवारी सुरू झाले.

न्यूनतम ओहोटीच्या ३ दिवसांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

प्रवाळाच्या स्थानांतरासाठी पालिकेमार्फत सप्टेंबरमध्ये वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर स्थानांतराविरोधात पर्यावरणप्रेमींनी अनेक माध्यमांतून विरोध दर्शवायला सुरुवात केली. प्रवाळाचे स्थानांतर यशस्वी होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याची शक्यता या वेळी तज्ज्ञांनी मांडली होती. गेल्या दोन महिन्यांत पालिकेच्या प्रस्तावावर केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर १३ ते १५ नोव्हेंबर या न्यूनतम ओहोटीच्या (लो टाइड) काळात स्थानांतराचे काम हाती घेण्यात आले.

वरळी येथील प्रवाळ वसाहतीच्या स्थानांतराचे काम पहिल्या दिवशी सुरू झाले. यामध्ये एकूण १७ वसाहतींपैकी १५ वसाहतींचे स्थानांतर दिवसअखेरीस पूर्ण झाल्याची माहिती सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे पर्यावरणीय सल्लागार विवेक कुलकर्णी यांनी दिली. उर्वरित काम शनिवारी केले जाईल.

स्थानांतर असे केले…

वरळी येथील प्रवाळ वसाहत ही खडकावर विखुरलेली होती. त्यामुळे प्रवाळ असलेला खडकाच्या भागाचे तुकडे काढण्यात आले. पुढील प्रक्रियेपूर्वी हे तुकडे कोरडे पडू नयेत म्हणून पाण्यात ठेवले जातात. या खडकास एक विशिष्ट प्रकारचा गोंद लावण्यात आला. त्यानंतर स्थानांतर करावयाच्या जागी हा तुकडा बसविण्यात आला. स्थानांतर केलेल्या जागी अन्य प्रवाळ असल्याने स्थानांतर केलेल्या प्रवाळांना टॅगिंग करण्यात आल्याचे, विवेक कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे स्थानांतर केलेले प्रवाळ पुढील काळात सहज ओळखू येतील आणि त्यांची वाढ होत आहे की नाही हे तपासणे सुकर होईल.

हाजी अली येथील प्रवाळ हे एका शिलाखंडावर आहेत. त्यामुळे हा शिलाखंडच उचलून अन्य जागी ठेवण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. राज्याच्या किनारपट्टीवर प्रवाळांच्या स्थानांतराचे हे पहिलेच काम असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बारावी परीक्षा रद्द करण्याकडे राज्याचा कल

Web News Wala

अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त

Web News Wala

आंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये मुसळधार पावसाचा कहर

Team webnewswala

Leave a Reply