Team WebNewsWala
Other व्यापार शहर समाजकारण

महाराष्ट्रात सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी

महाराष्ट्रात करोना वेगाने पसरत असताना आरोग्य विभागाने कोणत्याही पान बिडी दुकानात अथवा महाराष्ट्रात सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घातली.

महाराष्ट्रात करोना वेगाने पसरत असताना आरोग्य विभागाने आता कोणत्याही पान बिडी दुकानात अथवा महाराष्ट्रात सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश आरोग्य विभागाने जारी केला असून पोलीस व महापालिका यांनी या आदेशाची तातडीने व कठोरपणे अमलबजावणी करावी अशी अपेक्षा आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात शाळा – कॉलेजमधील तरुणाई मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगारेट पासून गुटख्याच्या अहारी गेले आहे. वेळोवेळी राज्यातील अनेक सरकारांनी दारुबंदी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी अनेकदा बैठका घेतल्या आहेत. आरोग्य विभागाने यापूर्वी सुट्टी सिगारेट व बिडीची विक्री होऊ नये यासाठी विधी व कायदा विभागासह सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र विधी विभागाकडून पुरेसे पाठबळ न मिळाल्याने आरोग्य विभागाला याबाबत आदेश काढता आला नव्हता, असे आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

शाळा- महाविद्यालये तसेच रुग्णालये व धार्मिक स्थळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी

दरम्यानच्या युती शासनाच्या काळात शाळा- महाविद्यालये तसेच रुग्णालये व धार्मिक स्थळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी लागू करण्यात आली. मात्र आजही त्याची ठोस अमलबजावणी कोणत्याही संबंधित विभागाने केलेली नाही. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे याबाबतच्या केंद्राच्या कायद्याचे पालन महाराष्ट्रात कायदा अस्तित्वात आल्यापासून कधीच करण्यात आले नाही.

‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३’ ( जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) या अंतर्गत सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतेवेळी पाकिटाच्या ८५ टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश स्पष्ट शब्दात छापणे बंधनकारक आहे. सिगारेट पाकिट अथवा बिडी बंडलाची विक्री केल्यास कायद्यात अपेक्षित असलेला उद्देश म्हणजे ‘आरोग्याच्या धोक्याची कल्पना’ हा साध्य होतो. मात्र तेच सुटी म्हणजे सिगारेटच्या पाकिटातून एकेक सिगारेट काढून विकल्यास ग्राहकाला धोक्याची कल्पना कायद्याच्या अर्थाप्रमाणे मिळत नाही. आरोग्य विभागाचे हे म्हणणे विधी व न्याय विभागाने आता करोनाच्या पार्श्वभूमीवर मान्य केले.

अनेक राज्यांनी सुटी सिगारेट व बिडीच्या विक्रीला याच मुद्द्यावर बंदी घातली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे हेही महाराष्ट्रात असा आदेश आरोग्य विभागाकडून निघावा यासाठी आग्रही होते. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी हा आदेश जारी करताना सर्व कायदेशीर बाजू तपासून पाहिल्या तसेच हा आदेश काढताना एपिडेमिक अॅक्ट १८९७, इंडियन पिनल कोड १८६०, मुंबई पोलीस अॅक्ट १९५१, क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३, नॅशनल डिझास्टर अॅक्ट २००५ आणि केंद्राचा कायदा संदर्भित केला आहे. २४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी येणार असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

यापुढे सिगारेट वा बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट वा बिडी बंडल विकत घ्यावे लागणार

यामुळे यापुढे सिगारेट वा बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट वा बिडी बंडल विकत घ्यावे लागणार असून प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात व्यसनांकडे वळलेल्या तरुणाईला रोखण्यासाठीच हा आदेश काढल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले. कॉलेजमधील तरुणच नव्हे तर तरुण मुलीही अगदी सहजपणे सिगारेट ओढताना दिसतात. तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ती सर्व पावले आरोग्य विभाग उचलेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

येऊर जंगलात भरकटले युवक, शोध घेण्यास यश

Team webnewswala

अखेर टिकटॉक ने भारतातुन गाशा गुंडाळला

Web News Wala

भारताने केला एअर बबल करार आता बिनधास्त करा विमान प्रवास

Team webnewswala

Leave a Reply